भगवद्‌गीता अध्याय सोळावा अर्थासहित

भगवद्‌गीता अध्याय सोळावा अर्थासहित

 

मूळ सोळाव्या अध्यायाचा प्रारंभ

अथ षोडशोऽध्यायः
अर्थ

सोळावा अध्याय सुरु होतो.

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १६-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले अभयम्‌ = भयाचा संपूर्ण अभाव, सत्त्वसंशुद्धिः = अंतःकरणाची पूर्ण निर्मलता, ज्ञानयोगव्यवस्थितिः = तत्त्वज्ञानासाठी ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती, च = आणि, दानम्‌ = सात्त्विक दान, दमः = इंद्रियांचे दमन, यज्ञः = भगवान, देवता आणि गुरुजन यांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, (तथा) = तसेच, स्वाध्यायः = वेद व शास्त्रे यांचे पठन व पाठन आणि भगवंतांचे नाम व गुण यांचे कीर्तन, तपः = स्वधर्माच्या पालनासाठी कष्ट सहन करणे, च = आणि, आर्जवम्‌ = शरीर व इंद्रिये यांच्यासहित अंतःकरणाची सरलता ॥ १६-१ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्त्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन-पाठन, भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता ॥ १६-१ ॥

मूळ श्लोक

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ १६-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहिंसा = मन व वाणी आणि शरीर यांच्याद्वारे कोणत्याही प्रकाराने कोणालाही कष्ट न देणे, सत्यम्‌ = यथार्थ आणि प्रिय भाषण, अक्रोधः = आपल्यावर अपकार करणाऱ्यावर सुद्धा न रागावणे, त्यागः = कर्मांमध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, शान्तिः = अंतःकरणाची उपरती म्हणजे चित्ताच्या चंचलतेचा अभाव, अपैशुनम्‌ = कोणाची निंदा वगैरे न करणे, भूतेषु = सर्व भूतप्राण्यांच्या ठिकाणी, दया = निर्हेतुक दया, अलोलुप्त्वम्‌ = इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला असतानासुद्धा त्यामध्ये आसक्ती नसणे, मार्दवम्‌ = कोमलता, ह्रीः = लोक व शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण करण्याची लाज वाटणे, अचापलम्‌ = व्यर्थ क्रियांचा अभाव ॥ १६-२ ॥

अर्थ

काया-वाचा-मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे ॥ १६-२ ॥

मूळ श्लोक

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तेजः = तेज, क्षमा = क्षमा, धृतिः = धैर्य, शौचम्‌ = बाहेरची शुद्धी, (तथा) = तसेच, अद्रोहः = कोणाच्याही ठिकाणी शत्रुभाव नसणे, (च) = आणि, नातिमानिता = स्वतःच्या ठिकाणी मोठेपणाच्या अभिमानाचा अभाव, (एते सर्वे) = ही सर्व तर, भारत = हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), दैवीम्‌ सम्पदम्‌ = दैवी संपत्ती, अभिजातस्य = घेऊन उत्पन्न झालेल्या पुरुषाची लक्षणे, भवन्ति = आहेत ॥ १६-३ ॥

अर्थ

तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे – ही सर्व हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. ॥ १६-३ ॥

मूळ श्लोक

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌ ॥ १६-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दम्भः = दंभ, दर्पः = घमेंड, च = आणि, अभिमानः = अभिमान, च = तसेच, क्रोधः = राग, पारुष्यम्‌ = कठोरपणा, च = आणि, अज्ञानम्‌ एव = अज्ञानसुद्धा, (एते सर्वे) = ही सर्व, आसुरीम्‌ = आसुरी, सम्पदम्‌ = संपदा, अभिजातस्य = घेऊन उत्पन्न झालेल्या पुरुषाची लक्षणे आहेत ॥ १६-४ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. ॥ १६-४ ॥

मूळ श्लोक

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ १६-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

दैवी = दैवी, सम्पत्‌ = संपदा, विमोक्षाय = मोक्षाला, (च) = आणि, आसुरी = आसुरी संपदा, निबन्धाय = संसार बंधनाला कारण, मता = मानली गेली आहे, (अतः) = म्हणून, पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), मा शुचः = तू शोक करू नकोस, (यतः) = कारण, दैवीम्‌ संपदम्‌ = दैवी संपदा घेऊन, अभिजातः असि = तू उत्पन्न झालेला आहेस ॥ १६-५ ॥

अर्थ

दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), तू शोक करू नकोस. कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. ॥ १६-५ ॥

मूळ श्लोक

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ १६-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अस्मिन्‌ = या, लोके = लोकात, भूतसर्गौ = भूतांची सृष्टी म्हणजे मनुष्य समुदाय, द्वौ एव = दोनच प्रकारचे आहेत (एक तर), दैवः = दैवी प्रकृती असणारा, च = आणि (दुसरा), आसुरः = आसुरी प्रकृती असणारा (त्यांमधील), दैवः = दैवी प्रकृती असणारा तर, विस्तरशः = विस्तारपूर्वक, प्रोक्तः = सांगितला गेला आहे, (इचानीम्‌) = आता, आसुरम्‌ = आसुरी प्रकृती असणाऱ्या मनुष्यसमुदायाबाबत विस्तारपूर्वक, मे = माझ्याकडून, शृणु = तू ऐक ॥ १६-६ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), या जगात मनुष्यसमुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यांपैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्यसमुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. ॥ १६-६ ॥

मूळ श्लोक

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ १६-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

प्रवृत्तिम्‌ = प्रवृत्ती, च = आणि, निवृत्तिम्‌ च = निवृत्ती या दोन्ही गोष्टी, आसुराः = आसुरी स्वभाव असणारे, जनाः = पुरुष, न विदुः = जाणत नाहीत (म्हणून), तेषु = त्यांच्या ठिकाणी, न शौचम्‌ = आत-बाहेरची शुद्धी तर नसतेच, न आचारः = श्रेष्ठ आचरण नसते, च न सत्यम्‌ अपि विद्यते = आणि सत्य भाषण सुद्धा नसते ॥ १६-७ ॥

अर्थ

आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ॥ १६-७ ॥

मूळ श्लोक

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्‌ ॥ १६-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

ते = ते आसुरी प्रकृती असणारे पुरुष, आहुः = म्हणतात की, जगत्‌ = जग हे, अप्रतिष्ठम्‌ = आश्रयरहित, असत्यम्‌ = सर्वथा असत्य, (च) = (आणि), अनीश्वरम्‌ = ईश्वराशिवाय, अपरस्परसम्भूतम्‌ = आपोआपच केवळ स्त्रीपुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झाले आहे, (अत एव) = म्हणून, कामहैतुकम्‌ (एव) = केवळ कामच याचे कारण आहे, अन्यत्‌ = याशिवाय आणखी काही, किम्‌ = काय आहे ॥ १६-८ ॥

अर्थ

ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की, हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्रीपुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे. त्याशिवाय दुसरे काय आहे? ॥ १६-८ ॥

मूळ श्लोक

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ १६-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एताम्‌ = या, दृष्टिम्‌ = मिथ्या ज्ञानाचा, अवष्टभ्य = अवलंब करून, नष्टात्मानः = ज्यांचा स्वभाव नष्ट होऊन गेला आहे, (तथा) = तसेच, अल्पबुद्धयः = ज्यांची बुद्धी मंद आहे असे ते, अहिताः = सर्वांचा अपकार करणारे, उग्रकर्माणः = क्रूरकर्मी पुरुष, (केवलम्‌) = केवळ, जगतः = जगाच्या, क्षयाय = नाशासाठीच, प्रभवन्ति = समर्थ होतात ॥ १६-९ ॥

अर्थ

या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ॥ १६-९ ॥

मूळ श्लोक

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद्‌गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १६-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

दुष्पूरम्‌ = कोणत्याही प्रकाराने पूर्ण न होणाऱ्या, कामम्‌ = कामनांचा, आश्रित्य = आश्रय घेऊन, मोहात्‌ = अज्ञानामुळे, असद्ग्राहान्‌ = मिथ्या सिद्धांतांचे, गृहीत्वा = ग्रहण करून, (च) = आणि, अशुचिव्रताः = भ्रष्ट आचरण धारण करून, दम्भमानमदान्विताः = दंभ, मान आणि मद यांनी युक्त पुरुष, प्रवर्तन्ते = (संसारात) विचरण करतात ॥ १६-१० ॥

अर्थ

ते दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. ॥ १६-१० ॥

मूळ श्लोक

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ १६-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

प्रलयान्ताम्‌ = मृत्यूपर्यंत टिकून राहाणाऱ्या, अपरिमेयाम्‌ = असंख्य, चिन्ताम्‌ = चिंतांचा, उपाश्रिताः = आश्रय घेणारे, कामोपभोगपरमाः = विषयभोग भोगण्यामध्ये तत्पर असणारे, च = आणि, एतावत्‌ = इतकेच सुख आहे, इति = असे, निश्चिताः = समजणारे आहेत ॥ १६-११ ॥

अर्थ

तसेच ते आमरणान्त असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे, असे मानणारे असतात. ॥ १६-११ ॥

मूळ श्लोक

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्‌ ॥ १६-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आशापाशशतैः = आशेच्या शेकडो जाळ्यांत, बद्धाः = गुरफटलेली ती माणसे, कामक्रोधपरायणाः = काम व क्रोध यांना परायण होऊन, कामभोगार्थम्‌ = विषयभोगांच्यासाठी, अन्यायेन = अन्यायपूर्वक, अर्थसञ्चयान्‌ = धन इत्यादी पदार्थांचा संग्रह करण्यासाठी, ईहन्ते = कर्मे करीत असतात ॥ १६-१२ ॥

अर्थ

शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम-क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्‍न करीत असतात. ॥ १६-१२ ॥

मूळ श्लोक

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्‌ ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्‌ ॥ १६-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अद्य = आज, मया = मी, इदम्‌ = हे, लब्धम्‌ = प्राप्त करून घेतले आहे, (अधुना च) = आणि आता, इमम्‌ = हा, मनोरथम्‌ = मनोरथ, प्राप्स्ये = मी लवकरच प्राप्त करून घेईन, मे = माझ्याजवळ, इदम्‌ = इतके, धनम्‌ = धन, अस्ति = आहे, पुनः अपि = पुन्हा सुद्धा, इदम्‌ = हे, भविष्यति = होऊन जाईल ॥ १६-१३ ॥

अर्थ

ते विचार करतात की, मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. ॥ १६-१३ ॥

मूळ श्लोक

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १६-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

असौ = तो, शत्रुः = शत्रू, मया = माझ्याकडून, हतः = मारला गेला आहे, च = आणि, (तान्‌) = त्या, अपरान्‌ अपि = दुसऱ्या शत्रुंना सुद्धा, अहम्‌ = मी, हनिष्ये = ठार करीन, अहम्‌ = मी, ईश्वरः = ईश्वर आहे, भोगी = ऐश्वर्य भोगणारा आहे, अहम्‌ = मी, सिद्धः = सर्व सिद्धींनी युक्त आहे, (च) = आणि, बलवान्‌ = बलवान, (तथा) = तसेच, सुखी = सुखी आहे ॥ १६-१४ ॥

अर्थ

या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. ॥ १६-१४ ॥

मूळ श्लोक

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १६-१५ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अहम्‌) = मी, आढ्यः = पुष्कळ श्रीमंत, (च) = आणि, अभिजनवान्‌ = मोठे कुटुंब असणारा, अस्मि = आहे, मया = माझ्या, सदृशः = सारखा, अन्यः = दुसरा, कः = कोण, अस्ति = आहे, यक्ष्ये = मी यज्ञ करीन, दास्यामि = दान देईन, (च) = आणि, मोदिष्ये = मौज-मजा करीन, इति = अशाप्रकारे, अज्ञानविमोहितः = अज्ञानाने मोहित असणारे, (तथा) = तसेच, अनेकचित्तविभ्रान्ताः = अनेक प्रकारच्या कल्पनांनी भ्रान्तचित्त झालेले, मोहजालसमावृताः = मोहरूपी जालात गुरफटून गेलेले, (च) = आणि, कामभोगेषु = विषयांच्या भोगांमध्ये, प्रसक्ताः = अत्यंत आसक्त झालेले आसुर लोक, अशुचौ = महान अपवित्र अशा, नरके = नरकात, पतन्ति = पडतात ॥ १६-१५, १६-१६ ॥

अर्थ

मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन. दाने देईन. मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगांत अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ॥ १६-१५, १६-१६ ॥

मूळ श्लोक

आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्‌ ॥ १६-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आत्मसम्भाविताः = स्वतःच स्वतःला मोठे मानणारे, ते = ते, स्तब्धाः = घमेंडी पुरुष, धनमानमदान्विताः = धन आणि मान यांच्या मदाने युक्त होऊन, दम्भेन = पाखंडीपणाने, नामयज्ञैः = केवळ नावाच्या यज्ञांच्या द्वारा, अविधिपूर्वकम्‌ = शास्त्रविधीने रहित असे, यजन्ते = यजन करतात ॥ १६-१७ ॥

अर्थ

ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन यज्ञ करतात. ॥ १६-१७ ॥

मूळ श्लोक

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १६-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहङ्कारम्‌ = अहंकार, बलम्‌ = बल, दर्पम्‌ = घमेंड, कामम्‌ = कामना, क्रोधम्‌ = क्रोध इत्यादींचा, संश्रिताः = आश्रय घेणारे, च = आणि, अभ्यसूयकाः = दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष, आत्मपरदेहेषु = आपल्या स्वतःच्या व दुसऱ्यांच्या शरीरामध्ये, (स्थितम्‌) = स्थित असणाऱ्या, माम्‌ = मज अंतर्यामीचा, प्रद्विषन्तः = द्वेष करणारे होतात ॥ १६-१८ ॥

अर्थ

ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरांत असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. ॥ १६-१८ ॥

मूळ श्लोक

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्‌ ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १६-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

द्विषतः = द्वेष करणाऱ्या, अशुभान्‌ = पापाचारी, (च) = आणि, क्रूरान्‌ = क्रूरकर्मे करणाऱ्या, तान्‌ = त्या, नराधमान्‌ = नराधमांना, अहम्‌ = मी, संसारेषु = संसारात, अजस्रम्‌ = वारंवार, आसुरीषु योनिषु एव = आसुरी योनीमध्येच, क्षिपामि = टाकीत असतो ॥ १६-१९ ॥

अर्थ

त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूरकर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनींतच टाकतो. ॥ १६-१९ ॥

मूळ श्लोक

आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्‌ ॥ १६-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), माम्‌ = माझी, अप्राप्य एव = प्राप्ती न होताच, मूढाः = ते मूढ, जन्मनि जन्मनि = जन्म-जन्मांतरी, आसुरीम्‌ = आसुरी, योनिम्‌ = योनी, आपन्नाः = प्राप्त करून घेतात, (ततः) = मागाहून, ततः = त्या (योनी) पेक्षाही, अधमाम्‌ = अतिनीच, गतिम्‌ = गतीप्रत, यान्ति = पोचतात म्हणजे घोर नरकांत पडतात ॥ १६-२० ॥

अर्थ

हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), ते मूढ मला न प्राप्त होता जन्मोजन्मी आसुरी योनींतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात. अर्थात घोर नरकांत पडतात. ॥ १६-२० ॥

मूळ श्लोक

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥ १६-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कामः = काम, क्रोधः = क्रोध, तथा = आणि, लोभः = लोभ, इदम्‌ = ही, त्रिविधम्‌ = तीन प्रकारची, नरकस्य = नरकाची, द्वारम्‌ = दारे, आत्मनः = आत्म्याचा, नाशनम्‌ = नाश करणारी म्हणजे त्याला अधोगतीला नेणारी आहेत, तस्मात्‌ = म्हणून, एतत्‌ = या, त्रयम्‌ = तिन्हींचा, त्यजेत्‌ = त्याग केला पाहिजे ॥ १६-२१ ॥

अर्थ

काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. ॥ १६-२१ ॥

मूळ श्लोक

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्‌ ॥ १६-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), एतैः = या, त्रिभिः = तीन, तमोद्वारैः = नरकांच्या दारातून, विमुक्तः = सुटलेला, नरः = पुरुष, आत्मनः श्रेयः = स्वतःच्या कल्याणाचे, आचरति = आचरण करतो, ततः = त्यामुळे, पराम्‌ = परम, गतिम्‌ = गतीप्रत, याति = जातो म्हणजे माझी प्राप्ती करून घेतो ॥ १६-२२ ॥

अर्थ

हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परम गती मिळवितो. अर्थात मला येऊन मिळतो. ॥ १६-२२ ॥

मूळ श्लोक

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ १६-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

शास्त्रविधिम्‌ = शास्त्राच्या विधींचा, उत्सृज्य = त्याग करून, यः = जो पुरुष, कामकारतः = आपल्या इच्छेनुसार मनात येईल तसे, वर्तते = आचरण करतो, सः = तो, सिद्धिम्‌ = सिद्धी, न अवाप्नोति = प्राप्त करून घेत नाही, न पराम्‌ गतिम्‌ = परम गतीही (प्राप्त करून घेत) नाही, (तथा) = तसेच, न सुखम्‌ = सुखही (प्राप्त करून घेत) नाही ॥ १६-२३ ॥

अर्थ

जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. ॥ १६-२३ ॥

मूळ श्लोक

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्मात्‌ = म्हणून, ते = तुझ्यासाठी, इह = या, कार्याकार्यव्यवस्थितौ = कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था ठरवण्यात, शास्त्रम्‌ = शास्त्रच, प्रमाणम्‌ = प्रमाण आहे, (एवम्‌) = असे, ज्ञात्वा = जाणून, शास्त्रविधानोक्तम्‌ = शास्त्राच्या विधीने नियत, कर्म (एव) = कर्मच, कर्तुम्‌ = करणे, अर्हसि = तुला योग्य आहे ॥ १६-२४ ॥

अर्थ

म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ॥ १६-२४ ॥

मूळ सोळाव्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला. ॥ १६ ॥

श्रोत : mr.wikisource

भगवद्‌गीता अध्याय सोळावा,भगवद् गीता श्लोक,भगवद् गीता अध्याय,Bhagavad Gita,Bhagavad Gita Summary,Bhagavad Gita Book,Bhagavad Gita Online,भगवद्‌गीता,Bhagavad Gita adhyay 16 ,grantha,ग्रंथ,संतमहंत ,संत महंत ,sant mahant,santmahant

नवीन माहिती

या वेळेत एवढीच माहिती उपलब्ध आहे