हेचि दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा !
आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते.
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।
हा अभंग आरती, भजन वा कीर्तनानंतर म्हटल्या जातो. शेकडो वेळा हा अभंग आम्ही आरतीनंतर म्हटलाही असेल, पण आमचे म्हणण्यात व तुकोबांचे म्हणण्यात खूप अंतर आहे. तुकोबा म्हणतात:
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
एक तर हे की, आम्ही जेव्हा म्हणतो, देवा हेच दान दे की तुझा विसर पडू नये, तेव्हाच आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते. त्या अन्य काळी आम्हाला विसरच पडलेला असतो. हा अभंग म्हणून आमचे देवाचे स्मरण करणेच हे सांगते की, स्मरणाचे काळापर्यंत आम्हाला देवाचे स्मरण नव्हतेच. आता स्मरण करत आहोत. संसाराचेच स्मरणात होतो. देवा आता तुझे स्मरण करत आहोत. पण आता विसर होऊ देऊ नकोस, पण देव कसा विसर पाडेल ? विसर तर संसारामुळे आम्हाला पडतो देवाचा
परंतु तुकोबारायांचे देव असा अविरत स्मरणात आहे की, त्याचे विस्मरणच होऊ नये. ही स्थिती. मोडू नये व चुकूनही विसरच न व्हावा यासाठी तुकोबाराय देवाला विनंती करतात. तुकोबा व देव एकरुप झाले आहेत. अविस्मरणीय अशी स्थिती आहे तुकोबांची देवासोबत, जशी आमचे करिता देवाचे स्मरण ही घटना आहे, तशी तुकोबारायांसाठी विस्मरण ही घटना होऊ शकते म्हणून त्या शंकेतून ते देवाला त्याचा विसर न पडण्याचे दान मागतात. आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणे आहे. रोजच विसर आहे व विसर न व्हावा म्हणणे आहे. देवाला त्याचा विसर न पडण्याचे आमचे दान मागणे मोठे विरोधाभासी आहे.
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।
देव तर निर्गुण आहे. मग तुकोबा देवाचे गुण गाण्याची गोष्ट कशी करत आहेत ? देवाचे दोन्ही गुण आहेत. निर्गुण व सगुण, देवाचे ब्रह्मांडाचे निराकाराचे कार्य आहे व अवतार रुपाने सगुण कार्यही आहे. दोन्ही कार्याचे गुण आवडीने गाण्यात तुकोबांचा आनंद आहे.
दुसरे ते म्हणत आहेत की, हिच माझी सर्व जोडी आहे. सर्व जे काही जोडलेले आहे ते तुझे गुण आहेत. आम्ही परदार, साधन सामुग्री, संपत्ती जोडलेली असते. तुकोबा म्हणतात, देवा, तुझे गुण गाण्याने जो आनंद मिळतो तिच माझी संपत्ती आहे. पुढे तुकोबा म्हणतात.
नलगे मुक्ति धन संपदा सतसंग देई सदा ।।
मुक्ती का नको ? धन संपदा नको ठीक आहे. कारण धन संपत्ती आमच्यासाठी सुखाची आहे तर संतानी जाणले ती दुःखाचे मूळ आहे. पण सर्व भगवत भक्त तर मुक्तीचीच शुभकामना ठेवतात. मात्र मुक्त होण्यात तुकोबा जाणतात, मुक्ती झाली म्हणजे देवा आम्ही तुलाही मुकलो. तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्यावर मी व तू हया दरम्यान चालणारा भक्तीचा आनंदच संपला. म्हणून मुक्ती नको संत संग दे. ज्यामुळे तुझ्या निर्गुण निराकार रुपासी जुळून मुक्त होण्यात जो आनंद मिळणार नाही तो संत संगाने मिळतो. म्हणून जन्मोजन्मी, गर्भवास सोसून तुझ्या सगुण भक्तीरसाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।
गर्भवासातून तर आम्ही आलो, पण गर्भवासाची यातना आमच्या अनुभवात नाही. दुसऱ्या जीवाला गर्भवासात आम्ही आज विज्ञानाने निर्माण केलेल्या यंत्राव्दारे पाहू शकतो. तरी पण तो अनुभव आम्ही आठवू नाही शकत. अनुभव नाही सांगू शकत. कारण हा अनुभव देह बुध्दीने घेण्यास शरीरच पूर्ण नसते. मात्र चेतना तर तो भयंकर असा अनुभव घेते. गर्भ रुपाने आमची आईच्या उदरात स्थापना झाल्यापासून आमचा देह तेथे। पूर्ण विकसीत होतो. गर्भाचे पोकळीत जार जनामध्ये शरीर तरंगत विकसीत होत असते, तेव्हा शरीर, मेंदुतो अनुभव आठविण्याचे अवस्थेतच नसतात, तेच जाराचे पाणी नाका, तोंडात, कानात डोळ्यात भरून असते. जन्मानंतर आम्ही शरीराचे स्तरावरच जगतो. चेतनेच अनुभव मागे पडतात. दुसऱ्या रितीने आज आम्ही गर्भ सदृश्य वातावरणाची बाह्य व्यवस्था करू शकतो. काही ध्यान मार्गामध्ये अशी गर्भ वातावरणाची बाह्य कृत्रिम व्यवस्था करुन गर्भावस्थेच्या ध्यान विधी साचकांकडून करवून घेतल्या जातात. या ध्यान विधीशिवाय आम्हाला तशा कृत्रिम गर्भाशयाची तशीच सजल व्यवस्था केली व शिक्षा म्हणून नऊ महिने ठेवतो म्हटले तर कुणी राजी होणार नाही. ही देवाची माया आहे की नऊ महिन्याचा कारावासाहून भयंकर असा गर्भवास माणसाचे स्मरणात उतरत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, इतका भयंकर गर्भवासही सुखे स्विकारू जर संत संग मिळत असेल. कारण संत संग हा पर्यायाने विठ्ठलाचा संग आहे. संत म्हणजे ते संत में निष्काम झाले सर्व कर्मात ज्यांनी जाणले विठ्ठलाला पावले विठ्ठलाला जे विठ्ठल रुपच झाले. त्यांचे भेटणे, त्यांचा संग हा विठ्ठलाचा संग आहे.
– शं.ना. बेडे पाटील
4 thoughts on “हेचि दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा !”
पूर्ण चुकीचा अर्थ सांगितला आहे.. अजून खूप अभ्यास बाकी आहे असे दिसते.
“:सत्य शोधक” तुम्हीच लिहा अभ्यासपूर्वक.
छान अर्थ वाक्य, यावर सत्यशोधकांनी दिलेली टिपण्णी वाचली, जर हा अर्थ चुकीचा आहे तर बरोबर अर्थ कुठे वाचायला मिळेल कळवावे.
यामध्ये ‘ नलगे मुक्ति धन संपदा’ नसून ‘ मुक्ति आणि संपदा ‘ असे आहे असे वाचनात आले आहे.