उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रा

उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रा

 

उत्पत्ती एकादशी, व्रत आणि पूजाविधी आणि व्रत कथा ही माहिती एकत्रित!

उत्पत्ती एकादशी

आळंदी यात्रा

भविष्योत्तर पुराणा प्रमाणे आज एकादशी तिथीचा जन्म झाला एकादशी हि साक्षात विष्णुंची कन्या तिने मूर राक्षसाचा वध केला आजच्या दिवशी उपास करून एकादशी महात्म्य श्रवण केले तर एक हजार एकादशा केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकात प्रवेश मिळतो.

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची
कार्तिकी आळंदी वारी !!

अलं ददाति इति आलंदि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर आहेतच, पण त्यांची पावन
आळंदी नगरी देखील ” जो जे वांच्छिल तो ते लाहो । ” हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणा-या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही लौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री माउलींच्या साम्राज्यात उणेपणाच कायमचा उणावलेला आहे !!

आज कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजे-या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. उद्या द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपु-यातून फिरून परत येते. परवा त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे!
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय तर श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने शपथपूर्वक म्हणतात,

चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ॥
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर ॥
जन्म नाही रे आणिक।
तुका म्हणे माझी भाक ॥

अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, ” कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू ! ” श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,

धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

” कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्रीज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन ! ” असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत

आळंदी यात्रेनिमित्त आज आपण संत ज्ञानेश्वर व चांगदेवाची एक कथा पाहू. 

१३ व्या शतकात चांगदेव नावाचे महान योगी होवून गेले,त्यांना सर्व योगविद्या प्राप्त होत्या ,योगविद्येच्या शक्तीने ते चौदाशे वर्ष जिवंत होते,त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला होता,चांगदेवाना जेव्हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाबद्दल व चमत्काराबद्दल समजले ,तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतले पण ज्ञानेश्वर फक्त १५ वयाचे असल्याने त्याना चीरंजीव लिहावे का त्यांचे ज्ञान खूप मोठे म्हणून त्यांना तीर्थरूप लिहावे, हे न समजल्याने त्यांनी आपल्या दूताकरवी एक कोरा कागद संदेश म्हणून ज्ञानेश्वरांना पाठवला, कोरा कागद बघून मुक्ताई म्हणाली एवढी तपश्च्चर्या करून चांगदेव कोरा तो कोराच राहिला,त्या कागदावर वेदातील पासष्ट ओव्या लिहून ज्ञानेश्वरांनी तो कागद चांगदेवाला परत पाठवला ,ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ते ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.

चांगदेवाला राग आला.,आपले योगसामर्थ्य दाखवण्यासाठी शिष्यसमुदाय बरोबर घेतला व स्वत एका वाघावर बसून हातात विषारी नागाचा चाबूक घेवून हजारो लोकांसोबत मिरवणुकीने ज्ञानेश्वरांना भेटायला निघाला मिरवणूक आळंदी गावात शिरली ज्ञानेश्वरांना हि वार्ता समजली तेव्हा ते आपल्या भावंडासोबत झोपडीच्या पडक्या भिंतीवर बसले होते,चांगदेवाच्या स्वागतासाठी त्यांनी निर्जीव भिंतीत चैतन्य निर्माण करून तिलाच आपले वाहन बनवले,व भावंडासह उडत्या भिंतीवरून चांगदेवाच्या स्वागताला निघाले,ते दृश्य पाहून चांगदेवाचा अहंकार नष्ट झाला व तो ज्ञानेश्वरांचा भक्त बनले .

हि भिंत आजही आळंदीला पाहायला मिळते.

ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥

मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥

ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥

तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आळंदी चे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
इतिहास
आळंदी माहात्म्य

आळंदी (देवाची) हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.

आळंदी मंदिर
आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे.

इतिहास
चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.[२]आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे .

आळंदी माहात्म्य
आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही.

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.

‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे. यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावति-अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत.

‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही. या ग्रंथाचे संक्षिप्‍त रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते.

उत्पत्ती एकादशीचे व्रत भगवान विष्णुंना समर्पित

उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णुंना समर्पित केलं जातं. या दिवशी भगवान विष्णुची विशेष उपासना केली जाते. विधी पूर्वत या व्रताला केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असा समज आहे. या व्रताचा विधी केल्यानं दांपत्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक उर्जादेखील संपूण जाते. त्यामुळे घरात समृध्दी नांदते, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार, भय यापासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं.

जे श्रद्धाळू एकादशीचा उपास करत नाहीत परंतु उपास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी पासून त्यास सुरवात करावी, कारण ह्याच एकादशी पासून ह्या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते.

उत्पत्ती एकादशी व्रत व पूजा विधी

एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपास दशमीच्या रात्रीपासून सुरु होतो.

ह्यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजना नंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी. रात्री बिलकुल भोजन घेऊ नये. अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातः काली ब्राह्म मुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्रीविष्णूंची पूजा करून कथा श्रवण करावी. ह्या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तीनी वाईट कर्म करणाऱ्या, पापी, दुष्ट व्यक्तींची संगत टाळावी.

रात्री भजन – कीर्तन करावे व जाणता – अजाणता झालेल्या अपराधांची भगवान श्रीविष्णू ह्यांच्याकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातः काली ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. नियमबद्ध केलेला उपास खूपच पुण्य फलदायी असतो.

उत्पत्ती एकादशी व्रत कथा

सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत असे. मूर नावाचा त्यांचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमा समोर टिकाव लागत नव्हता. त्या नंतर देवतांनी भगवान श्रीविष्णूंकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारा पासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना केली. देवतांच्या अनुरोधा प्रमाणे भगवान श्रीविष्णू ह्यांनी दैत्यांवर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. ह्या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्रीविष्णू ह्यांना झोप येऊ लागली व मग ते बद्रिकाश्रम स्थित बारा योजने लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला. भगवान श्रीविष्णूंना झोपलेले पाहून त्त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान श्रीविष्णूंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्या नंतर दैत्य व कन्या ह्यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले,

ह्या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्च्छित केले व त्याचा शिरच्छेद केला, त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा भगवान श्रीविष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले कि दैत्य मरण पावला आहे, ते आता विचार करू लागले कि दैत्यास कोणी मारले. त्यावेळी कन्येने सांगितले कि दैत्य त्यांना मारण्यासाठी तयार होता तेव्हा तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला. भगवान श्रीविष्णुंनी तिचे नांव एकादशी असे ठेवले, कारण एकादशीलाच ती भगवान श्रीविष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळेच ह्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. भगवान श्रीविष्णुंनी एकादशीला असा वर दिला कि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णुलोकात स्थान मिळेल.

श्रोत :- arkarirojnishi.in

नवीन माहिती