श्री दत्त जयंती
श्री दत्तात्रेय जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते. सध्या दत्त नवरात्र सुरू आहे. मार्गशीर्ष अष्ठमी ते पौर्णिमा या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जाते.
श्री दत्तात्रेय जयंती (Lord Dattatreya Jayanti) मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा दत्तात्रेय जयंती (Datta Jayanti 2022) आज 7 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगात श्री दत्त जयंती (Datta Arati) साजरी करण्यात येणार आहे.
भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच 3 चेहरे आणि 6 भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे, असे म्हणतात.
शीघ्र कृपा करणारे, भक्त वत्सल असलेले श्री दत्तात्रेय भगवान यांना स्मृतिगामी तसेच सृतिमात्रानुगत्ता असे देखील संबोधले जाते. दक्षिण भारतात दत्त संप्रदाय हा श्री दत्तात्रेय भगवान यांनाचा प्रमुख आराध्य मानतात. ऋषी अत्री आणि अनुसया याच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला होता.
दत्त जयंती शुभ मुहूर्त –
मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात श्री दत्तात्रेय भगवान यांची पूजा केली जाते. आज 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 02 मिनिटांला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. तर 8 डिसेंबरला सकाळी 9 वाजून 38 मिनिटांला पौर्णिमा समाप्त होणार आहे. बुधवारी दिवसभर तुम्ही श्री दत्त प्रभुचं व्रत, पूजा, व्रत कथा, भजन-कीर्तन करू शकतात.
श्री दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव(दत्त जयंती ) सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
दत्तजयंतीचे महत्त्व
दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.
या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
श्री दत्तजन्म कथा
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत.मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली.त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले.अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे.
अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी.देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली.अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत.ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत.संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे.महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
श्री दत्ताची आरती (Datta Aarti)
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
श्रोत :- india.com