संत मुक्ताबाई अभंग

संत मुक्ताबाई अभंग

 

१ ते ४६


मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥ १ ॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी । आणूनि लवकरी तारी जन ॥ २ ॥
ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची । निरसिली जनाची भ्रमभुली ॥ ३ ॥
मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली । चरणीं समरसली हरिपाठें ॥ ४ ॥


शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥ १ ॥
कैसागे माये हा तारकु दिवटा । पंढरी वैकुंठा प्रगटला ॥ २ ॥
न कळे याची गती आदि मध्य अंती । जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥ ३ ॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम । शून्याहि शून्य समशेजबाजे ॥ ४ ॥


प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ १ ॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं । पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥ २ ॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेसी निज । निर्गुणेंसी चोज केलें सयें ॥ ३ ॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल । निवृत्तीनें चोखाळ दाखविलें ॥ ४ ॥


अलिप्त संसारी हरिनामपाठें । जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥ १ ॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदां । संसारआपदा भाव तोडी ॥ २ ॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी । चेतविला हरि आप आपरूपें ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां । अभिन्नव भेदा भेदियेलें ॥ ४ ॥


आधी तूं मुक्तचि होतासिरे प्राणीया । परि वासनें पापिणीया नाडिलासी ।
आधींचे आठवीं मग घेई परी । हरिनाम जिव्हारीं मंत्रसार ॥ १ ॥
आदि मध्य हरि ऊर्ध्व पै वैकुंठ । जाईल वासना हरि होईल प्रगट ॥ ध्रु० ॥
एकतत्त्व धरी हरिनाम गोड । येर तें काबाड विषय ओढी ।
नाम पैं सांडी वासना पापिणी । एक नारायणीं चाड धरी ॥ २ ॥
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना । मुक्तामुक्ती राणा हरिपाठें ।
नामाचेनि घोटें जळती पापराशी । न येती गर्भवासी अरे जाना ॥ ३ ॥


नाम मंत्रें हरि निज दासां पावे । ऐकोनी घ्यावें झडकरी ॥ १ ॥
सुदर्शन करीं पावे लवकरी । पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया ॥ २ ॥
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ । नामेंचि प्रगट आम्हांलागीं ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार । हरि पारावार केला आम्हीं ॥ ४ ॥


भजनभावो देहीं नित्यनाम पेठा । नामेंचि वैकुंठा गणिका गेली ॥ १ ॥
नाममंत्र आम्हां हरिरामकृष्ण । दिननिशी प्रश्न मुक्तिमार्गु ॥ २ ॥
नामचि तारकु तरले भवसिंधु । हरिनामछंदु मंत्रसार ॥ ३ ॥
मुक्ताई चिंतनीं हरिप्रेम पोटी । नित्य नाम घोटी अमृत सदां ॥ ४ ॥


मुक्त पैं अखंड त्यासि पैं फावलें । मुक्तचि घडलें हरिच्या पाठें ॥ १ ॥
रामकृष्णें मुक्त जाले पैं अनंत । तारले पतीत युगायुगीं ॥ २ ॥
कृष्णनामें जीव झाले सदा शिव । वैकुंठ राणिव मुक्त सदां ॥ ३ ॥
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ति कोडे । जालें पैं निवाडें हरिरूप ॥ ४ ॥


मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं । हरिनाम वर्णी सदा काळ ॥ १॥
नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची । हरिनामछंदाची गोडी थोरी ॥ २ ॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं कदां । निरंतर धंदा रामकृष्ण ॥ ३ ॥
मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥ ४ ॥

१०
आदि मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरि । सबाह्य अभ्यंतरी हरि एकु ॥ १ ॥
नलगती तीर्थें हरिरूपें मुक्त । अवघेंचि सूक्त जपिनिलें ॥ २ ॥
ज्याचेनि नामें मुक्त पैं जडमूढ । तरले दगड समुद्रीं देखा ॥ ३ ॥
मुक्ताई हरिनामें सर्वदां पै मुक्त । नाहीं आदि अंत उरला आम्हां ॥ ४ ॥

११
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा । तया नाहीं कदा गर्भवास ॥ १ ॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी । चित्त नारायणीं मुक्तलग ॥ २ ॥
अव्यक्ती पैं व्यक्ति चित्तासि अनुभव । सर्व सर्वीं देव भरला दिसे ॥ ३ ॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान । चित्त नारायण झालें त्याचें ॥ ४ ॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला । परतोनि अबोला प्रपंचेसी ॥ ५ ॥
मुक्ताईचें चित्त निरंतर मुक्त । हरि हेंचि संचित आम्हांघरीं ॥ ६ ॥

१२
सर्वी सर्व सुख अहं तेचि दुःख । मोहममता विष त्यजीयेलें ॥ १ ॥
साधक बाधक करूनि विवेक । मति मार्ग तर्क शोधियेला ॥ २ ॥
सर्वतीर्थ हरि दुभाळु धनुवो । वोळला कणवा चातकाचा ॥ ३ ॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा । आकळावयाचा सत्व धरीं ॥ ४ ॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें काहाणी । ऐको जाय कर्णीं तंव परता जाय ॥ ५ ॥
मुक्ताई सोहंभावें भरले दिसे देवें । मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥ ६ ॥

१३
पूजा पूज्य वित्तें पूजक पै चित्ते। घाली दंडवतें भाव शीळ ॥ १ ॥
चंपक सुमनें पूजी कातळीने । धूप दिप मनें मानसिक ॥ २ ॥
भावतीत भावो वोगरी अरावो । पाहुणा पंढरीरावो हरि माझा ॥ ३ ॥
मुक्ताई संपन्न विस्तारूनि अन्न । सेवी नारायण हरि माझा ॥ ४ ॥

१४
अविट हे न विटे हरिचे हे गुण । सर्व सनातन ध्यातां रूपें ॥ १ ॥
साध्य हें साधन हरिरूपें ध्यान । रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥ २ ॥
असंगेंचि नटु नटलों पैं साचे । नाहीं त्या यमाचें भय आम्हां ॥ ३ ॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली । साधना दिधली चांगयासी ॥ ४ ॥

१५
व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें । एकतत्त्व दीपाचें ह्रदयीं नादें ॥ १ ॥
चांगया फावलें फावोनी घेतलें । निवृत्तीनें दिधलें आमुच्या करीं ॥ २ ॥
आदि मध्य यासी सर्वत्रनिवासी । एक रूपें निशी दवडितु ॥ ३ ॥
मुक्ताई पूर्णता एकरूपें चिता । आदि अंतु कथा सांडियेली ॥ ४ ॥

१६
मनें मन चोरी मनोमय धरी । कुंडली आधारी सहस्त्रकारी ॥ १ ॥
मन हें वोगरु आदि हरिहरु । करी पाहुणेरु आदिरूपा ॥ २ ॥
सविया विसरू घेसील पडिभरू । गुरुकृपा विरु विरे सदां ॥ ३ ॥
मुक्ता मुक्तचित्तें गुरुमार्ग विते । पावन त्वरिते भवीं भाव ॥ ४ ॥

१७
सर्व रूपीं निर्गुण संचलें पैं सर्वदा । आकार संपदा नाहीं तया ॥ १ ॥
आकारिती भक्त मायामय काम । सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥ २ ॥
निवृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता । सर्वही समता सांगितली ॥ ३ ॥
मुक्ताई अविट मुक्तपंथरत । जीवीं शिवीं अनंत तत्त्वविद ॥ ४ ॥

१८
उर्णाचिया गळां बांधली दोरी । पाहो जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥ १ ॥
तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं । दुजी जंव साई तंव हें अंध ॥ २ ॥
ऐसी मी हो अंध जात होतें वायां । प्रकृति सावया पावली तेथें ॥ ३ ॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज । हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥ ४ ॥

१९
सहस्त्रदळीं दळीं हरि आत्मा हा कुसरी । नांदे देहा भीतरीं अलिप्त सदां ॥ १ ॥
रविबिंब बिंबे घटमठीं सदा । तें नातळे पै कदां तैसे आम्हा ॥ २ ॥
अलिप्त श्रीहरि सेवी का झडकरी । सेवितां झडकरी हरिच होआल ॥ ३ ॥
चंदनाच्या दृतीं वेधल्या वनस्पती । तैंसे आहे संगतीं या हरिपाठें ॥ ४ ॥
मुक्ताई चिंतित चिंतामणी चित्तीं । इच्छिलें पावती भक्ता सदां ॥ ५ ॥

२०
नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली । ऐशी एके बोली बोलती जीव ॥ १ ॥
उगेंचि मोहन धरूनि प्रपंची । त्यासी पै यमाची नगरी आहे ॥ २ ॥
जीव जंतु जड त्यासी उपदेशी । त्यासी गर्भवासीं घाली देवो ॥ ३ ॥
मुक्ताई श्रीहरि उपदेशी निवृत्ति । संसार पुढती नाहीं आम्हां ॥ ४ ॥

२१
देऊळींचा देवो घरभरी भावो । कळसेवीण वावो जातु असे ॥ १ ॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें । चित्तअनुरागें भजतीना ॥ २ ॥
असोनि न दिसे उगयाचि पिसें । घेती वायां वसे सज्जनेवीण ॥ ३ ॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं । साकारलें आहम् न कळे तया ॥ ४ ॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली । माया आड ठेली अरे रया ॥ ५ ॥
मुक्ताई परेसी दुभतें चहूंसी । सत्रावी सर्वरसीं एका देवें ॥ ६ ॥

२२
विश्रांति मनाची निजशांति साची । मग त्या यमाची भेटी नाहीं ॥ १ ॥
अधिकारी मन मग सारी स्नान । रोकडेंचे साधन आलें हाता ॥ २ ॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान । चित्तीं नारायणमंत्र जपे ॥ ३ ॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन । नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥ ४ ॥

२३
मुक्तपणें सांग देवो होय देवांग । मीपणें उद्वेग नेघे रया ॥ १ ॥
वाऊगे मीपण आथिलें प्रवीण । एक नारायण तत्त्व खरें ॥ २ ॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी । द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥ ३ ॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत । अवघाचि अनंत दिसे देहीं ॥ ४ ॥

२४
अंतर बाह्य निकें सर्व इंद्रियांचे चोज । निजीं निजबीज एकतत्त्व ॥ १ ॥
आदि नाहीं अनादि नाहीं । तें रूप पाही अविट बाईये ॥ २ ॥
मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण । आकार सगुण प्रपंचींचा ॥ ३ ॥

२५
नामबळें देहीं असोनि मुक्त । शांति क्षमा चित्त हरिभजनें ॥ १ ॥
दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा । निरंतर वासना हरिरूपीं ॥ २ ॥
माधव मुकुंद हरिनाम चित्तीं । सर्व पैं मुक्ति नामपाठें ॥ ३ ॥
मुक्ताईचें धन हरिनामें उच्चारु । अवघाचि संसारु मुक्त केला ॥ ४ ॥

२६
करणें जंव कांही करूं जाये शेवट । तंव पडे आडवाटें द्वैतभावें ॥ १ ॥
राहिलें करणें नचलें पैं कर्म । हरिविण देहधर्म चुकताहे ॥ २ ॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना । तंव साधनी परता पडो पाहे ॥ ३ ॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ । तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥ ४ ॥

२७
मुक्तपणें ब्रीद बाधोनियां द्विज । नेणती ते बीज केशव हरी ॥ १ ॥
ज्याचेनि मुक्तता सर्वही पै मुक्त । करूनियां रत न सेविती ॥ २ ॥
वेदीं बोलियेले ब्रह्मार्पणभावें । सदा मुक्त व्हावें अरे जना ॥ ३ ॥
मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित । अवघेचि मुक्त सेवितां हरी ॥ ४ ॥

२८
उजियेडु कोडें घेतलो निवाडें । आपुलिये चाडे जीवनकळा ॥ १ ॥
एकरूप दिसे सर्वांघटीं भासे । एक ह्रषिकेशें व्यापियेलें ॥ २ ॥
त्रिपुटि भेदुनी सर्वत्रगामिनी । एका रूपें मोहिनी तेही सदां ॥ ३ ॥
नित्यता उन्मत्त अवघेचि भरित । एकतत्त्वें दावित सोहं भावें ॥ ४ ॥
मुक्ताई सांगती कैसेनि गुंपती । मायादेवी समाप्ति निजतत्त्वीं ॥ ५ ॥

२९
विस्तारूनि रूप सांगितलें तत्त्वीं । कैसेनी परतत्त्वीं वोळखी जाली ॥ १ ॥
सोहंभावें ठसा कोणते पैठा । उभाउभीं वाटा कैसा जातु ॥ २ ॥
या नाही सज्ञान हा अवघा ज्ञान । आपरूप धन सर्वांरूपीं ॥ ३ ॥
मुक्ताई मुक्तता सर्वपणें पुरता । मुक्ता मुक्ति अपैता निजबोधें ॥ ४ ॥

३०
मुक्तामुक्त कोडे पाहिलें निवाडें । ब्रह्मांडा एवढें महत्तत्त्व ॥ १ ॥
निजतत्त्व आप अवघाचि पारपाक । एका रूपें दीपक लावियेला ॥ २ ॥
आदि मध्यनिज निर्गुण सहज । समाधि निजतेज आम्हा रामू ॥ ३ ॥
मुक्ताईचें धन आत्मराम गूण । देखिलें निधान ह्रदय घटीं ॥ ४ ॥

३१
निर्गुणाची सैज सगुणाची बाज । तेथें केशीराज पहुडले ॥ १ ॥
कैसे याचें करणें दिवसां चांदिणे । सावळें उठणें एका तत्त्वें ॥ २ ॥
नाहीं या ममता अवघीच समता । आदि अंतु बिंबतां नलगे वेळू ॥ ३ ॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण । जीव शिव संपूर्ण एकतत्त्वें ॥ ४ ॥

३२
दिवसा शीतळ निशीयेसी बरळ । अधऊर्ध्व केवळ निजबीज ॥ १ ॥
या आदि नाहीं अनादिही नाहीं । कैचा मोहप्रवाहीं दिसेचिना ॥ २ ॥
शक्तीचे संपुष्टीं मुक्ता मुक्त घट । अवघे वैकुंठ दिसताहे ॥ ३ ॥
मुक्ताई परिपाक अवघे रूप एक । देखिलें सम्यक सोहं भावें ॥ ४ ॥

३३
जेथें जे पाहे तेथें तें आहे । उभारोनि बाहे वेद सांगे ॥ १ ॥
सोमकांतीं झरा कोठील दुसरा । तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥ २ ॥
हेतु मातु आम्हां अवघाचि परमात्मा । सोहंभावें सोहं आत्मा सर्वीं असे ॥ ३ ॥
मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण । देहीं देहो सौजन्य निजतेजें ॥ ४ ॥

३४
पूर्णपणें सार अविट आचार । सारासार विचार निजतेजें ॥ १ ॥
निर्गुणीं आकार सर्वत्र साकार । एकरूपें विचार निजतेजें ॥ २ ॥
मुक्ताई चैतन्य उवघेंचि धन । आदि अंतु खुण निवृतीची ॥ ३ ॥

३५
आदि मध्य अंतु न कळोनि प्रांतु । असे जो सततु निजतत्त्वें ॥ १ ॥
कैसेनि तत्त्वतां तत्त्व पैं अनंता । एकतत्त्वें समता आपेंआप ॥ २ ॥
आप जंव नाहीं पर पाहासी काई । विश्वपणें होई निजतत्त्वीं ॥ ३ ॥
माजि मजवटा चित्त नेत तटा । परब्रह्म वैकुंठा चित्तानुसारें ॥ ४ ॥
मुक्ताई सांगती मुक्तनामपंक्ति । हरिनामें शांति प्रपंचाचीं ॥ ५ ॥

३६
मुक्तलग चित्तें मुक्त पै सर्वदां । रामकृष्ण गोविंदा वाचें नित्य ॥ १ ॥
हरिहरिछंदु तोडी भवकंदु । नित्य नामानंदु जपे रया ॥ २ ॥
सर्वत्र रूपडें भरलेंसे दृश्य । ज्ञाता ज्ञेय भासे हरिमाजी ॥ ३ ॥
मुक्ताई सधन हरी रूप चित्तीं । संसारसमाप्ति हरिच्या नामें ॥ ४ ॥

३७
चितासी व्यापक व्यापूनि दुरी । तेंचि माजी घरीं नांदे सदा ॥ १ ॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी । शांति वसे घरीं सदोदित ॥ २ ॥
नाहीं या शेवट अवघाचि निघोट । गुरुतत्त्वें वाट चैतन्याची ॥ ३ ॥
मुक्ताई संपन्न मुक्त पैं सेजुले । सर्वत्र उभविलें मुक्ति चोख ॥ ४ ॥

३८
प्रारब्ध संचित आचरण गोमटें । निवृत्तितटाकें निघालो आम्ही ॥ १ ॥
मुळींचा पदार्थ मुळींच पैं गेला । परतोनि अबोला संसारासी ॥ २ ॥
सत्यमिथाभाव सत्वर फळला । ह्रदयीं सामावला हरिराज ॥ ३ ॥
अव्यक्त आकार साकार हे स्फुर्ति । जीवेशिवें प्राप्ति ऐसें केलें ॥ ४ ॥
सकामनिष्कामवृत्तीचा निजफेर । वैकुंठाकार दाखविलें ॥ ५ ॥
मुक्तलग मुक्त मुक्ताईचें तट । अवघेचि वैकुंठ निघोट रया ॥ ६ ॥

३९
शांति क्षमा वसे देहीं देव पैसे । चित्त समरसें मुक्त मेळु ॥ १ ॥
निर्गुणें उपरमु देव पुरुषोत्तमु । प्रकृति संगमु चेतनेचा ॥ २ ॥
सज्ञानीं दिवटा अज्ञानी तो पैठा । निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता ॥ ३ ॥
मुक्ताई दिवस अवघा ह्रषीकेश । केशवेंविण वास शून्य पैसे ॥ ४ ॥

४०
देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी । तया घातली पुशी योगेश्वरीं ॥ १ ॥
दिवसा चांदिणें रात्रीं पडे उष्ण । कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥ २ ॥
ऋषी म्हणे चापेकळिकाळ पैं कांपे । प्रकाश पिसे मनाच्या धारसे एक होय ॥ ३ ॥
एकट एकलें वायांचि पै गुंफलें । मुक्त पैं विठ्ठलें सहज असे ॥ ४ ॥
वैकुंठ अविट असोनि प्रकट । वायांचि आडवाट मुक्ताई म्हणे ॥ ५ ॥

४१
मुंगी उडाली आकाशीं । तिणें गिळीलें सूर्याशीं ॥ १ ॥
थोर नवलाव जाहला । वांझे पुत्र प्रसवला ॥ २ ॥
विंचु पाताळाशी जाय । शेष माथां वंदी पाय ॥ ३ ॥
माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हांसली ॥ ४ ॥

४२
अखंड जयाला देवाचा शेजार ।
कारे अहंकार नाही गेला ।।
मान अपमान वाढविसी हेवा ।
दिवस असता दिवा हाती घेसी ।
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ ।
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले ।
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली का ।
घरी कामधेनु ताक मागू जाय ।
ऐसा द्वाड आहे जगा माजी ।
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना ।
आधी अभिमाना दूर करा।।

४३
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।
अवघी साधन हातवटी । मोले मिळत नाही हाटी ।
कोणी कोणा शिकवावे । सारे शोधुनिया घ्यावे ।।
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्यल ठायीचे ठायी ।
तुम्ही तरुनी विश्वतारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।

४४
मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले ।
मुक्तची घडले हरीच्या पाठी ।
रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता ।
तरले पतीत युगायुगी ।
कृष्णनामे जीव सदा झाले शिव ।
वैकुंठ राणिव मुक्त सदा ।
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे ।
जाल पै निवाडे हरिरूप ।

४५
वाहवा साहेबजी । सद्गुरुलाल गुसाईजी
लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला ।
पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला ।
सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना ।
जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना ।
सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई ।
एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई ।

४६
कडाडली वीज निरंजनी जेव्हा ।
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ।
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई ।
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार ।
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी ।
जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।
गेले निवारुनी आकाश आभुट ।
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई ।

ताटीचे अभंग १ ते १२

संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी। आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागरी वास झाला।उंच नीच काय त्याला॥१॥
अहो आपण जैसे व्हावें। देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ। स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले। त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें । वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले। एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥


वरी भगवा झाला नामे। अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू। जगी विटंबना बाधू॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें। विवेक नांदे त्याच्या सर्वे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी। शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


एक आपण साधू झाले। येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ। अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां। विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं। मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


ब्रह्म जैसें तैशा परी।आम्हा वडील भूतें सारी ॥१॥
अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥२॥
जीभ दातांनी चाविली। कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥
मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥१॥
बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥२॥
जीव जीवासी पैं दयावा । मग करूं नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सांडी कल्पना उपाधी। तीच साधूला समाधी॥१॥
वाद घालावा कवणाला। अवघा द्वैताचा हो घाला॥२॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी। भूतें बापुंडी शेजारी ॥४॥
अवघी ईश्वराची करणी। काय तेथें केलें कोणीं ॥५॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥

१०
गिरीगव्हारे कशासाठीं। रागें पुरवीली पाठी ॥२॥
ऐसा नसावा संन्यासी। परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥
घर बांधिले डोंगरी। विषया हिंडे दारोदारीं ॥४॥
काय केला योगधर्म। नाही अंतरी निष्काम ॥५॥
गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥

११
अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥३॥
वेळे क्रोधाचा उगवला। अवघा योग फोल झाला॥४॥
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

१२
अवघी साधन हातवटी। मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला। दूरी नाही देव त्याला॥२॥
कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥
तुम्ही तरुनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

श्रोत :- santsahitya

नवीन माहिती