पंढरपूर तीर्थक्षेत्र
पंढरपूरपंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव ‘पंडरगे’ असे आहे.[१] मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. [२].हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत
विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे.
- पंढरपुरास (temple of pandharpur) भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात.
- तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर (temple in pandharpur) जवळच आहे.
- मंदिर(pandharpur temple) पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत.
- पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत.
- त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात.
- संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात आहे.
- आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे.
- येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे.
- यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत.
- मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत.
- मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो.
- तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.
- हे सर्व काही आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळतं.
इतिहास
पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो. डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते. शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. ‘स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा ‘लानमडू’ हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली.आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाला.[३]विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशीही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त, तसेच इतर जातिधर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’च विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे.
चंद्रभागा
मुख्य पान: भीमा नदी
भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.
- पर्यावरणीय ऱ्हास
भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘नमामि चंद्रभागा अभियान’ हाती घेतले आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूरपर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वछता, नदीकाठी वृक्ष लागवड अश्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न आहे, अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.
- नमामि चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे २०१५ साली सुरू करण्यात आली पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुरवस्था नीट होईल.
वर्णन
चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी’ म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे पुरातन चुनेगच्ची नक्षीकाम आहे .
मंदिराचे स्वरूप
मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णूवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चौखांबीच्या दरवाजास चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते.
सजावट
विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते, तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.
परिसर
नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णूपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णूपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
नदीवरील घाट
१ अमळनेर
२ अहिल्याबाई
३ उद्धव
४ कबीर
५ कासार
६ कुंभार
७ खाका
८ खिस्ते
९ चंद्रभागा
१० दत्त
११ दिवटे
१२ मढे
१३ महाद्वार आणि
१४ लखुबाई
यात्रा
टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.
संत भानुदासमहाराजांनी विजयनगरहून श्रीविठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होताया दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणुन कार्तिकीस एकादशीस रथ काढण्यात येतो. इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे.गरिबापासून श्रीमान्तापायंत सार्वजन दरवर्षी मनोभावे इथे भेट देतात.
प्रमुख संस्था
गावात पक्के रस्ते ३४.५३ किमी. व कच्चे रस्ते १.५३ किमी. असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोळ आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजीपंत, संत गाडगे महाराज, बंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटगे महाराज इत्यादीचे मठ व धर्मशाळा आहेत.
गोरक्षण, अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडलिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इ. संस्था येथे मोलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिसठाणे आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो. येथे आठ बँका व दोन कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खण, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगला खप होतो. वारकऱ्यांस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या इ. वस्तूही येथे मिळतात.
श्रोत :- wikipedia