देवघरात देवांची मांडणी कशी असावी ?

देवघरात देवांची मांडणी कशी असावी ?

 

घरामध्ये देवपूजेत प्रत्येक देवतेच्या मूर्तीची संख्या किती असावी? जास्तीच्या मूर्तीचे काय करावे?
मला या विषयावर अनेक वेळा विचारले जाते आपल्या पैकी अनेकांनी या विषयावर माहिती पर लेख लिहण्यासाठी सांगितले हा लेख आपणास समर्पित करत आहे माझा हा प्रयत्न आवडला तर हा लेख आपल्या आप्तस्वकीयां बरोबर शेयर करा जेणे करून त्यांना पण या लेखाचा उपयोग होईल

सध्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या कमी आणि पूर्वापार चालत आलेल्या देवपूजेतील मूर्तीची संख्या १५/२० पर्यंत असते. पुढील पिढीमध्ये घरात नित्य देवपूजा होण्यासाठी देवतांच्या मूर्ति आवश्यक तेवढ्या आणि कमीतकमी असणे जरुरीचेआहे. धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंगे, दोन शंख, दोन शाळीग्राम, दोन सूर्य, तीन गणपति, तीन देवी पुजु नयेत असे धर्मसिंधुत सांगितले आहे

आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एकच मूर्ति देवपूजेत असावी. यामध्ये सुध्दा विष्णुस्वरुप पांडुरंग किंवा बाळकृष्ण, श्रीराम यापैकी एकच मूर्ति असावी. तसेच देवी स्वरुप दुर्गा, अन्नपूर्णा, महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ति असावी.

कार्यानिमित्त किंवा इतर वेळेस भेट म्हणून मिळालेल्या मूर्ति किंवा फोटो रोजच्या देवपूजेत घेऊ नयेत. तसेच तीर्थक्षेत्री गेल्यावर येताना तेथील फोटो – मूर्ति आणल्या जातात अशा मूर्ति सुद्धा देवपूजेत ठेवू नयेत म्हणजे देवपूजेत मूर्तीची संख्या वाढणार नाही. वास्तविक पाहता पूर्वीच्या काळी फोटो नव्हतेच. आता फोटोंचे प्रमाण खूपच वाढले आहे. पंचायतनामधील देवतांच्या फोटोची पूजा करण्याची आवश्यकता नाही. ग्रामदैवत, श्रीदत्त, बालाजी अशा प्रकारचे फोटो पूजेत ठेवावेत. इतर सर्व फोटो घरांमध्ये भिंतीवर इतर खोल्यांमध्ये लावावेत. देवतांच्या / साधुसंतांच्या फोटोंची संख्या सुद्धा मर्यादित ठेवणे पुढील काळासाठी योग्य होईल.

देवपूजेतील पंचायतन म्हणजे गणपति, देवी, विष्णु, महादेव व सूर्य यांची १-१ मूर्ति याशिवाय शंख, घंटा आणि कुळधर्म – कुलाचारातील टांक रोजच्या देवपूजेत असावेत. परंपरेने आणि भेट मिळाल्यामुळे देवपूजेत अनेक मूर्ति असतील तर पूर्वीपासून पूजेत असलेले आणि सुस्थितीत असलेले देव- टांक पूजेत ठेवावेत आणि जास्तीच्या मूर्ति – टांक इ. एका डब्यामध्ये ठेवून तो डबा देवघरात ठेवावा. काही ठिकाणी पितरांचे टांक बनवण्याची पद्धत आहे ते देवघरात ठेऊ नये. सणवार, मंगलकार्याचे निमित्ताने हे देव लिंबू – रांगोळीने स्वच्छ करुन त्यांची त्यादिवशी पूजा करावी. मात्र पुढील काळात सुद्धा देवतांच्या मूर्तीची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर डब्यातील मूर्तीची संख्या वाढत जाईल.

तसेच अनेक कुटुंबांमधुन कार्यानिमित्ताने नवीन देव, नवीन टांक करावयाची प्रथा आहे. कार्यानंतर कुटुंब विभक्त होऊन भावंड स्वतंत्र राहणार असतील आणि स्वतंत्रपणे देवपूजा करणार असतील तर त्यांनी देवांची नवीन मूर्ति न आणता आपल्याच घरातील जास्तीचे देव पूजेसाठी घ्यावेत. आणि जर पंचायतनामधिल १-२ देव नसतील तर तेवढ्या मूर्ति नवीन करुन घ्याव्यात.

वयोमानामुळे आणि एकटेच रहात असल्याने देवांची पूजा करणे शक्य नसेल अशावेळेस आपले देव पूजा करण्यासाठी कोणी घेण्यास तयार असल्यास त्यांना द्यावेत अन्यथा नाईलाज म्हणून हे देव समुद्रामध्ये विसर्जन करावेत. हे विसर्जन स्वतःस करणे शक्य नसेल तर तीर्थयात्रेस जाणा-या नातेवाईक, मित्र यांचेमार्फत विसर्जन करावे.

श्रोत :- raneguruji.com

नवीन माहिती