औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग
औंढा नागनाथ मंदिर (aundha nagnath temple) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ (aundha nagnath), जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. ‘आमर्दक सन्तान’ या नावाने ओळखल्या जाणार्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.
मंदिराची पौराणिक कथा
प्राचीन काळात दारूका नावाची एक राक्षसीण होती, तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. पार्वती तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारिक होते. दारूका जिकडे जाईल तिकडे ते तिच्यामागे जात असे. या वनात दारूका आपला पती दारूकसोबत राहत होती. दारूका आणि दारूक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले होते. काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते.
बंदी केलेल्या ब्राह्मणांमधील एक ब्राह्मण शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. ही गोष्ट जेव्हा दारूक राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरु केली. दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडुन टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारु लागला. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारूक आणि दारूका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की, मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रुपाने कायमचे वास्तव्य करेल. तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात.
कसे पोहोचाल
विमानाने
जवळचे विमानतळ: नांदेड आणि औरंगाबाद
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक: हिंगोली सर्वात मोठा रेल्वे स्टेशन: परभणी थेट दिल्लीहून मुंबई, बेंगलोर, हैदराबादशी जोडलेली आहे.
रस्त्याने
औरंगाबादपासून रस्ता मार्ग: 200 कि.मी. नांदेडपासून रस्ता मार्ग: 70 किमी. परभणीतून रस्ता मार्ग: 56 कि.मी. रोड द्वारा हिंगोलीपासून अंतर: 24 किमी.
श्रोत :- santsahitya