शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा : अर्थासहित
शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
अर्थ
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
हे शंकरा तुझा जयजयकार असो!
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस…
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे…
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले…
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली…
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या…
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या…
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो “श्रीराम जय राम जय जय राम ” हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या…
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो !
शंकराची आरती
- शेती विषयी माहिती :- कृषी महाराष्ट्र
- तीर्थक्षेत्र विषयी माहिती :- तीर्थक्षेत्र